स्पर्धा परीक्षासंबंधी माहिती मिळवण्यासाठी आमच्या 'परीक्षा विश्व' ब्लॉगला भेट द्या

Sunday, November 8, 2020

चालू घडामोडी

 


👉 दि.5 नोव्हेंबर 2020,चालू घडामोडी->

★ मुंबईत उघडकीस आलेल्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर दूरचित्रवाणी गुणांक पद्धतीचा (टीआरपी) फेरआढावा घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने बुधवारी प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी हेम्पती यांची चार सदस्यीय समिती स्थापन केली.तर ही समिती दोन महिन्यांत मंत्रालयाला अहवाल सादर करेल. त्यानंतर टीआरपीसंदर्भातील नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील.पैसे देऊन एखाद्या दूरचित्रवाणी वाहिन्यांचा टीआरपी वाढवण्याचा गैरप्रकार समोर आला असून त्याची व्याप्ती देशभर असण्याची शक्यता मानली जाते.या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष पथकाने आत्तापर्यंत दहा जणांना अटकही केली असून काही वाहिन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली आहे.तसेच या घोटाळ्याची गंभीर दखल घेत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने सध्या अमलात आणल्या जात असलेल्या ‘टीआरपी’ पद्धतीतील त्रुटी, त्यातील पळवाट, संभाव्य गैरव्यवहार आदी विविध मुद्यांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे.टीआरपीची विद्यमान यंत्रणा (रेटिंग एजन्सी) 2014 मध्ये प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे कार्यरत आहे. गेल्या सहा वर्षांत दूरचित्रवाणी क्षेत्रात झालेल्या बदलानुरूप रेटिंग व्यवस्थेतही सुधारणा करण्याची गरज आहे.


👉 भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात आणखी तीन राफेल विमानं दाखल :-->

■ तीन राफेल लढाऊ विमानांची दुसरी तुकडी आज भारतात दाखल झाली. गुजरातमधील जामनगर एअरबेसवर ही विमानं उतरली. यापूर्वी पंजाबमधील अंबालामध्ये पाच राफेल विमानांची पहिली बॅच दाखल झाली होती.भारताने फ्रान्सकडून एकूण 36 राफेल विमानं खरेदी केली आहेत. ती टप्प्याटप्प्याने भारतात दाखल होत आहेत. आत्तापर्यंत एकूण आठ विमानं भारतात आली आहेत.तर 29 जुलै रोजी पाच राफेल विमानांचा पहिला जत्था अंबाला एअरबेसवर दाखल झाला होता. अबुधाबीतील अल ढफरा एअरबेसवर एक थांबा घेत ही विमानं भारतात दाखल झाली होती. त्यानंतर 10 सप्टेंबर रोजी एका औपचारिक कार्यक्रमात ही विमान भारतीय हवाई दलात दाखल झाली होती.दरम्यान,हवाई दलाच्या माहितीनुसार आज आलेल्या तीन राफेल विमानांनी मध्ये कुठलाही थांबा घेतला नाही. प्रवासादरम्यान फ्रान्सच्या आणि भारताच्या विमानांद्वारे या विमानांमध्ये इंधन भरण्यात आले. हवाई दलाला प्रत्येक दोन महिन्यांनंतर तीन ते चार राफेल विमानं दिली जाणार आहेत.तसेच जून 1997 मध्ये रशियाच्या सुखोई-30 या लढाऊ विमानं भारतीय हवाई दलात सामिल झाल्यानंतर 23 वर्षांनंतर राफेल लढाऊ विमानं खरेदी करण्यात आली आहेत. या विमानांमुळे भारतीय हवाई दल अधिक आक्रमक होणार असून त्यांची क्षमताही वाढली आहे.


👉 अमेरिकेतील सहावीच्या अभ्यासक्रमात भारतीयाच्या जीवनावर आधारित धडा :-->

◆ भारताचे वनपुरुष म्हणजेच ‘फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया’ म्हणून लोकप्रिय असणाऱ्या जादव यांनी एकट्याने संपूर्ण जंगल उभारलं आहे असं सांगितल्यास तुम्हाला आश्चर्य वाटेल. पायेंग यांच्या या कामाची दखल आता थेट पाश्चिमात्य देशांकडून घेण्यात येत आहे. नुकताच अमेरिकेतील एका अभ्यासक्रमामध्ये पायेंग यांच्या कार्याबद्दल माहिती देणाऱ्या एका धड्याचा समावेश करण्यात आला आहे.नेक्टीकटमधील ब्रिस्टोल येथील ग्रीन हिल्स स्कूलने सहावीच्या अभ्यासक्रमामध्ये पायेंग यांच्या कामासंदर्भातील धड्याचा समावेश केला आहे. इकोलॉजी म्हणजेच पर्यावरणशास्त्रामध्ये या धड्याचा समावेश करण्यात आला आहे. आता येथील मुलं पद्मश्री पुरस्कारप्राप्त पायेंग यांच्या कार्याबद्दल शिकणार आहेत.जगभरामध्ये पर्यावरणासंदर्भात अनेक गोष्टी घडत असतानाच वातावरणातील बदलांसंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे.पर्यावरणाबद्दल संवेदनशील राहण्यासंदर्भात लहान मुलांना शालेय वयामध्येच शिक्षण देण्याच्या उद्देशाने जगभरामध्ये प्रयत्न सुरु आहेत. अशा मुलांसमोर वयाच्या 16 वर्षापासूनच पर्यावरण संरक्षणाचे काम करणाऱ्या पायेंग यांच्यापेक्षा अधिक चांगले उदाहरण कोणाचे असू शकते. पायेंग यांच्या कार्याने मुलांनाही प्रेरणा मिळेल या उद्देशाने त्यांच्या आयुष्यावरील धड्याचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आला आहे.जादव यांनी एकट्याने उभ्या केलेल्या जंगलाला मोलाईचे जंगल असं म्हणतात.या जंगलाचा आकार न्यू यॉर्कमधील सेंट्रल पार्कपेक्षाही मोठा आहे. हे जंगला आता बंगाल टायगर, भारतीय गेंडे, वेगवेगळ्या प्रकारचे सरपटणारे प्राणी आणि 100 हून अधिक प्रजातीची हरणं आणि ससे यांचा अधिवास आहे.

👉 मार्लन सॅम्यूएल्सची निवृत्ती :-->


● वेस्ट इंडिजचा फलंदाज मार्लन सॅम्यूएल्स याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. वेस्ट इंडिजने जिंकलेल्या दोन्ही ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत सॅम्यूएल्सने सर्वाधिक धावा फटकावल्या होत्या.सॅम्यूएल्स डिसेंबर 2018मध्ये अखेरचा सामना खेळला असून त्याने आपला निवृत्तीचा निर्णय जून महिन्यातच वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाला कळवला होता. मंडळाचे अध्यक्ष जॉनी ग्रेव्ह यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.तर 39 वर्षीय सॅम्यूएल्सने 79 कसोटी, 207 एकदिवसीय आणि 67 ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने 11 हजारपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय धावा काढल्या असून 150 बळीही मिळवले आहेत.


👉 आयसीसी क्रमवारीत कोहली,रोहितची मुसंडी :-->

■ भारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) जागतिक एकदिवसीय क्रमवारीत फलंदाजांमध्ये अव्वल दोन स्थानांवर कायम आहेत.कोहली (871) अग्रस्थानी असून रोहित (855) दुसऱ्या स्थानावर आहे. करोना साथीमुळे एकदिवसीय क्रिकेट गेल्या सात महिन्यांपासून कोहली आणि रोहितने खेळलेले नाही. मात्र तरीदेखील अव्वल दोन स्थाने त्यांना राखता आली आहेत.कोहली आणि रोहित वगळता भारताचा एकही फलंदाज अव्वल 10 जणांमध्ये नाही. गोलंदाजांमध्ये भारताचा जसप्रीत बुमरा (719) दुसऱ्या स्थानी कायम आहे. बुमरा वगळता भारताचा एकही गोलंदाज अव्वल 10 मध्ये नाही.तर ‘आयसीसी’ सांघिक क्रमवारीत इंग्लंड अव्वल स्थानी कायम असून भारत दुसऱ्या स्थानावर आहे.

👉 दि.6 नोव्हेंबर 2020 -->

◆ चीनने भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांना देशात प्रवेशबंदी केली आहे. चीनी व्हिसा किंवा रेसिडन्स परमिट असणाऱ्या भारतातील सर्व परदेशी नागरिकांना हा निर्णय लागू असणार आहे.तर इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, हा निर्णय तात्पुरत्या स्वरुपासाठी असून करोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे.याशिवाय चीनने भारतातून येणाऱ्या सर्व विमानांच्या उड्डाणावरही स्थगिती आणली आहे.चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून यासंबंधी अधिकृत निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यानुसार, भारतात असणाऱ्या चिनी दुतावासाकडून व्हिसा किंवा रेसिडन्स परमिट असणाऱ्या नागरिकांना प्रवासाची परवानगी मिळणार नाही.तसेच आपातकालीन परिस्थिती किंवा माणुसकीच्या आधारे चीनमध्ये प्रवेश मिळू इच्छिणारे चिनी दुतावासात व्हिसासाठी अर्ज करु शकतात. 3 नोव्हेंबर नंतर व्हिसा दिलेल्यांना कोणताही अडथळा येणार नाही.हा निर्णय फक्त भारतापुरता मर्यादित नसून याआधी इतर देशांसंबंधीही असा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाचे रुग्ण वाढत असल्याने उपाययोजना म्हणून चीन पावलं उचलत आहे.भारताशिवाय ब्रिटेन, बेल्जिअम आणि फिलिपाइन्समधून नागरिकांनाही चीनमध्ये प्रवेशबंदी आहे. याशिवाय फ्रान्स, जर्मनी आणि अमेरिकेतील नागरिकांना प्रवेश करण्याआधी वैद्यकीय तपासणी अहवाल सादर करण्याचा आदेश आहे.

👉 पर्यायी ऊर्जेचा वाटा 40 टक्के करण्याचे लक्ष्य :-->

● पॅरिस करारानुसार 2100 पर्यंत तापमानातील वाढ दोन अंश सेल्सिअसपर्यंत सीमित राखण्यासाठी देशाने अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात धोरणात्मक निर्णय घेतले असून कार्बन उत्सर्जनदेखील 35 टक्क्यांनी कमी केले जाईल, अशी माहिती केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी ‘इंडिया सीईओ फोरम’च्या पर्यावरण बदलासंदर्भातील कार्यक्रमात दिली.तर जगभरातील विविध देशांनी एकत्रितपणे पर्यावरणातील बदलांची गती कमी करण्यासाठी ‘पॅरिस करार’ केला आहे.त्याअंतर्गत तापमानातील वाढ दोन अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होऊ नये, हा प्रमुख उद्देश ठेवण्यात आला आहे.तसेच अमेरिकेने मात्र या करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

👉 मारुती चितमपल्ली यांना पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार :-->

●  महाराष्ट्र पक्षिमित्रतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यावर्षीचा पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार मारुती चितमपल्ली यांना जाहीर करण्यात आला.तर इतर पुरस्कारांमध्ये पक्षी संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार तांदलवाडी जि. जळगाव येथील उदय सुभाष चौधरी यांना तर पक्षी संशोधन पुरस्कार डॉ. अमोल सुरेश रावणकर, अचलपूर व किरण मोरे, अमरावतीयांना विभागून देण्यात आला आहे. पक्षी जनजागृती पुरस्कार नाशिक येथील सतीश गोगटे यांना जाहीर करण्यात आला आहे.तसेच महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे 2019 पासून या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली.यंदाच्या पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनात करण्यात येणार आहे. यावर्षी 34 वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन सोलापूर येथे 2021 मध्ये आहे. या पुरस्कारांचे वितरण या संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात केले जाणार आहे.

👉 ऑनलाइन वर्गाला फक्त पाच दिवस दिवाळीची सुट्टी :-->

★ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. उन्हाळी व गणेशोत्सवाच्या सुट्टीतही ते सुरू होते. त्यामुळे दिवाळीमध्ये मोठी सुट्टी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती.मात्र राज्य सरकारने 12 ते 16 नोव्हेंबर अशी फक्त पाच दिवसच ऑनलाईन वर्गाला सुट्टी जाहीर केली. तसेच शाळांना पूर्वी दिवाळीची सुट्टी 21 दिवस होती. त्यांनतर वार्षिक सुट्ट्या 80 ऐवजी 76 करण्यात आल्याने दिवाळी सुट्टी 18 दिवस केली. पण कोरोनामुळे अभ्यास उशिरा सुरू झाल्याने दिवाळी सुट्टीसंदर्भात काढलेल्या परिपत्रकात ही सुट्टी फक्त पाच दिवसांची केली.

-- 👉 7 नोव्हेंबर 2020,चालू घडामोडी -->

■ दिवाळीनंतर म्हणजे 16 नोव्हेंबरपासून देशातील महाविद्यालये आणि शिक्षण संस्था प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) हिरवा कंदील दाखविल्यानंतर आता 23 नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचा विचार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांनी दिली.तसेच राज्यात ‘पुनश्च हरिओम’नंतर वाहतुकीची साधने, प्रवास व्यवस्था, नाट्यगृहे, सिनेमागृहे, बाजारपेठा सुरू करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर माध्यमिक शाळेतील नववी ते बारावीचे, यातही प्राधान्याने दहावी, बारावीचे वर्ग सुरू करण्याचा मानस असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.तर सध्या शाळा बंद असल्या तरी शिक्षण ऑनलाइन सुरू आहे. राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊनच 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविल्या आहेत.

👉 कामकाज सल्लागार समितीचे मुनगंटीवार अध्यक्ष :-->

● महाराष्ट्र विधिमंडळाच्या विविध समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.तर भाजपचे नेते, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची महत्त्वाच्या अशा लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच उर्वरित 16 समित्यांपैकी सात समित्यांचे अध्यक्षपद शिवसेनेला, पाच समित्यांचे अध्यक्षपद राष्ट्रवादीला तर चार समित्यांचे अध्यक्षपद काँग्रेसला देण्यात आले आहे.लोकलेखा समितीचे अध्यक्षपद हे विरोधी पक्षाकडे असते.भाजपने त्यासाठी मुनगंटीवार यांचे नाव पूर्वीच दिलेले होते.राज्याचे विनियोजन लेखे व नियंत्रक तसेच महालेखापरीक्षक यांच्या अहवालांची तपासणी करणे हे महत्त्वाचे काम समिती करते.

👉 दिवाळीत फटाक्यांवर बंदी दिल्ली सरकारकडून निर्णय जाहीर :-->

●दिल्ली सरकारने दिवाळीत फटाक्यांवर बंदीचा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही माहिती दिली आहे.करोनास्थितीचा आढावा घेतल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी राजधानीत फटाक्यांवर बंदी घालण्याचा आणि रुग्णालयांमध्ये वैद्यकीय पायाभूत सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला.तर याआधी राजस्थान, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि हरियाणा या राज्यांनीही फटाक्यांवर बंदी घातली आहे.तसेच सध्या सुरु असलेला सणांचा हंगाम आणि प्रदूषण यामुळे दिल्लीतील करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. मुख्य सचिव, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि दंडाधिकाऱ्यासोबत करोना आढावा बैठकीनंतर बोलताना त्यांनी ही माहिती दिली.


👉 भारतीय वंशाच्या प्रियांका राधाकृष्णन यांचा समावेश न्यूझीलंडच्या मंत्रिमंडळात :-->

★ न्यूझीलंडच्या संसदेत भारतीय भाषेचा आवाज घुमला आहे. याचं महत्वाचं कारण ठरल्या आहेत प्रियांका राधाकृष्णन. मूळच्या भारतीय वंशाच्या असलेल्या प्रियांका राधाकृष्णन यांचा समावेश न्यूझीलंडच्या मंत्रिमंडळात झाला आहे.तर गुरुवारी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला.त्यावेळी प्रियांका राधाकृष्णन यांचा मल्याळीतून बोलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.प्रियांका राधाकृष्णन यांचा जन्म भारतातला. त्यानंतर त्या सिंगापूरला राहिल्या. प्रियांका राधाकृष्णन या आता न्यूझीलंडच्या नागरिक आहेत. लेबर पार्टीच्या खासदार म्हणून त्या निवडून आल्या. आता पंतप्रधान जेसिंडा अर्डन यांच्या मंत्रिमंडळातही त्यांना स्थान मिळालं आहे.


👉 केनचा 200 वा गोल,टॉटनहॅमचा विजय :-->

◆ हॅरी केनने 200वा गोल झळकावत टॉटनहॅमच्या युरोपा लीग फुटबॉलमध्ये लुडोगोरेट्सवर मिळवलेल्या 3-1 अशा विजयात योगदान दिले.तसेच टॉटनहॅमने याबरोबरच स्पर्धेत ‘ग’ गटात सहा गुणांसह अव्वल स्थान मिळवले.तर टॉटनहॅमकडून 300 वी लढत खेळणाऱ्या केनने योग्य ठरवला. त्याने 13व्या मिनिटाला गोल साजरा केल्यानंतर 43व्या मिनिटाला त्याच्याच पासवर लुकासने गोल केला.


👉 -- 8 नोव्हेंबर 2020,चालू घडामोडी -->

● भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) यावर्षीचं पहिलं सॅटलाईट आज लाँच करणार आहे. इस्रोनं दिलेल्या माहितीनुसार श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून 10 सॅटलाईट लाँच केली जाणार आहेत.तर आज दुपारी 3 वाजून 2 मिनिटांनी ही सॅटलाईट अवकाशात झेपावतील.इस्रोनं वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार पोलर सॅटलाईट लाँच वेहिकलची (PSLV-C49) ही 51 वी मोहीम असणार आहे. याद्वारे इस्रो EOS-01 प्रायमरी सॅटलाईट म्हणून आणि 9 इंटरनॅशनल कस्टमर सॅटेलाईट लाँच करणार आहे.तसेच EOS-01 हे एक अर्थ ऑब्झर्वेशन सॅटलाईट आहे. याचा उपयोग शेती, फॉरेस्ट्री आणि आपात्कालिन परिस्थितीत मदतीसाठी करण्यात येणार आहे. कस्टमर सॅटेलाईट्सला कमर्शिअल कराराअंतर्गत लाँच करण्यात येणार आहे. हा करार न्यूस्पेस इंडिया लिमिटेड आणि डिपार्टमेंट ऑफ स्पेससोबत करण्यात आला आहे.अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट हे अर्थ अर्थ ऑब्झर्वेशन रिसेट सॅटेलाइटचेच आधुनिक व्हर्जन आहे. याद्वारे ढगांच्या आडूनही पृथ्वीवरचे फोटो सुस्पष्टरित्या टिपता येणार आहेत.

👉 भारतीय वंशाच्या कमला हॅरीस होणार अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष :-->

★ अमेरिकेतील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत अखेर जो बायडन यांनी बाजी मारली असून विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे. त्यामुळे, लवकरच जो बायडन हे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष म्हणून व्हाईट हाऊसमध्ये पाऊल ठेवतील.तर दुसरी विशेष बाब म्हणजे अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांना संधी मिळणार आहे. कमला हरीस यांची उपराष्ट्राध्यक्षपदासाठी निवड झाली आहे.कमला हॅरीस या डेमोक्रेटीक पक्षाच्या उमेदवार असून राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडन यांनी उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी कमला हॅरीस यांच्या नावाची घोषणा केली होती. आता डेमोक्रेटीक पक्षाने अमेरिकेतील निवडणुकीत वर्चस्व सिद्ध केल्यामुळे कमला हॅरीस यांनाही उपराष्ट्रपती पदाचा सन्मान मिळणार आहे.तसेच अमेरिकेतील या महत्त्वाच्या पदासाठी निवडणूक लढवणारी पहिली कृष्णवर्गीय महिला म्हणून कमला हॅरीस मैदानात उतरल्या होत्या. कमला हॅरीस यांचं मूळ भारतीय असून भारताशी त्यांचं जवळचं नातं आहे.

👉 ‘पीएजीडी’चा मोठा निर्णय जम्मू-काश्मीरमधील ‘डीडीसी’निवडणूक लढवणार :-->

●'पीपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लेरेशन’ (पीएजीडी)च्या सदस्यांच्या आज झालेल्या बैठकीत एक महत्वपूर्ण व मोठा निर्णय घेण्यात आला.पिपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लेरेशनने जम्मू-काश्मीरमधील जिल्हा विकास परिषदांची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.विशेष म्हणजे, यासाठी सर्व स्थानिक पक्षांना सोबत घेतलं जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.'पीपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लेरेशन’ चे नेते सज्जाद लोन यांनी पत्रकारपरिषदेत याबाबत माहिती देताना सांगितले की, या संदर्भात जम्मूमधील अनेक राजकीय पक्षांशी चर्चा करण्यात आलेली आहे.बैठकीत डीडीसी निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. पीएजीडीच्या मते सर्व राजकीय पक्ष मिळून डीडीसी निवडणूक लढतील. जम्मू-काश्मीरमधील लोकांच्या एकसारख्या भावना आहेत.दरम्यान, जम्मू-काश्मीरचे राज्य निवडणूक आयुक्त केके शर्मा यांनी 20 जिल्हा विकास परिषदांसाठी निवडणुकीची व पंचायतींच्या पोटनिवडणुकांची घोषणा केलेली आहे.तर डीडीसी निवडणूक 28 नोव्हेंबर पासून 22 डिसेंबरपर्यंत आठ टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. कलम ३७० हटवण्यात आल्यापासूनची ही मोठी राजकीय घडामोड आहे.

👉 अमिरातीमध्ये मुस्लीम वैयक्तिक कायदे शिथिल :-->

◆ अविवाहित जोडप्यांना एकत्र राहण्याची मुभा, मद्यावरील निर्बंध शिथिल करणे आणि तथाकथित ‘ऑनर किलिंग’ हा गुन्हा ठरवणे अशारितीने देशाच्या इस्लामी वैयक्तिक कायद्यांमध्ये मोठे बदल करण्यात आल्याचे संयुक्त अरब अमिरातींनी (यूएई) शनिवारी जाहीर केले.तर देशाची कायदा यंत्रणा इस्लामी कायद्यांच्या कठोर अशा अंमलबजावणीवर आधारित असताना, अशाप्रकारच्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या विस्तारातून देशाचे बदलते रेखाचित्र प्रतिबिंबित झाले आहे. देशातील वेगाने बदलणाऱ्या समाजासोबत वाटचाल करण्याच्या अमिरातीच्या राज्यकर्त्यांच्या प्रयत्नांचेही या बदलांमध्ये प्रतिबिंब उमटले आहे.यूएई व इस्रायल यांच्यातील संबंध सामान्य करण्यासाठी अमेरिकेच्या पुढाकाराने या दोन देशांमध्ये झालेल्या करारानंतर ही घोषणा करण्यात आली आहे.तसेच कायद्यातील या सुधारणांची घोषणा ‘डब्ल्यूएएम’ या सरकारी वृत्तसंस्थेमार्फत करण्यात आली व तिचे तपशील सरकारशी संलग्न असलेल्या ‘दि नॅशनल’ या वर्तमानपत्रात जाहीर करण्यात आले.21 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या लोकांनी मद्यपान करणे, विक्री आणि मद्य बाळगणे यांसाठी असलेली दंड आकारण्याची तरतूद या बदलांन्वये रद्द करण्यात आली आहे. यापूर्वी मद्य खरेदी करणे, त्याची वाहतूक आणि मद्य घरात ठेवणे यांसाठी परवाना आवश्यक होता. नव्या नियमामुळे मुस्लिमांना मद्यप्राशनाची, अविवाहित जोडप्यांना एकत्र राहण्याची मुभा देण्यात आली आहे.

👉 अमेरिकेच्या अध्यक्षपदी बायडेन :-->

● विद्यमान अध्यक्ष, रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांना चीतपट करून डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन अमेरिकेचे 46वे अध्यक्ष म्हणून निवडून आले. पेनसिल्वेनियातील 20 निर्णायक प्रातिनिधिक मतांच्या जोरावर शनिवारी रात्री बायडेन यांना विजयी घोषित करण्यात आले.तर चार दिवसांपासून सुरू असलेल्या मतमोजणीकडे संपूर्ण जगाचे लक्ष होते. अखेर बायडेन यांनी ट्रम्प यांना पराभूत केले. बायडेन यांना 273, तर ट्रम्प यांना 214 मते पडली.

🌐 स्त्रोत-
https://www.google.com/amp/s/www.mpscworld.com/category/current-affairs/amp/

✍️ संकलन--> निलेश पाटील सर
    (संपादक/अॅडमिन,परीक्षा विश्व)
  📱 मो.9503374833

No comments:

Post a Comment

बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे (बीएआय) अध्यक्ष हिमंता बिस्वा सरमा यांची बीडब्ल्यूएफ परिषदेसाठी निवड.

 ✍️ बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे (बीएआय) अध्यक्ष हिमंता बिस्वा सरमा यांची बीडब्ल्यूएफ परिषदेसाठी निवड. बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे (बीएआय...