स्पर्धा परीक्षासंबंधी माहिती मिळवण्यासाठी आमच्या 'परीक्षा विश्व' ब्लॉगला भेट द्या

Tuesday, September 22, 2020

इतिहास : अश्मयुगीन काळ

 इतिहास : अश्मयुगीन काळ (भाग-1)-->


अश्मयुग : मानवी इतिहासातील अतिप्राचीन कालखंड. हा सु. पाच लाख ते दहा हजार वर्षापूर्वीपर्यंत साधारणत: मानण्यात येतो. सर्वसाधारणपणे माणसाला लेखनकला अवगत होण्यापूर्वीच्या इतिहासास प्रागैतिहास  म्हणतात.प्रागैतिहासिक काळापैकी एका सांस्कृतिक अवस्थेस, म्हणजे जेव्हा प्रामुख्याने दगडाचाच उपयोग हत्यारांसाठी केला जात होता त्या काळास ‘अश्मयुग’ असे म्हटले  जाते. यात मानवास कोणताही धातू व धातूचा जाणीवपूर्वक उपयोग माहीत नव्हता. प्रागितिहासाचा जवळजवळ चारपंचमांश भाग अश्मयुगानेच व्यापला आहे. अश्मयुगातील मानव त्याच्या भोवती असणाऱ्या लाकडे, हाडे, दगड इत्यादींचा उपकरणे व हत्यारे बनविण्यासाठी उपयोग करीत होता. त्यांपैकी लाकूड व हाडे सहज नाश पावणारी असल्याने या पदार्थांची आयुधे वा उपकरणे मानवी वस्त्यांच्या अवशेषांत सहसा आढळत नाहीत. मात्र दगड टिकाऊ असल्याने त्याची उपकरणे व आयुधे पुष्कळ सापडतात. यावरूनच या कालखंडास ‘अश्मयुग’ असे नाव देण्यात येते.


अश्मयुगातील माणूस सर्वत्र एकाच प्रकारची आयुधे वापरीत होता किंवा एकाच पद्धतीचे जीवन व्यतीत करीत होता असे समजणे चुकीचे ठरेल. स्थलकालपरत्वे वेग व दिशा भिन्न असल्या तरी त्याच्या जीवनात प्रगती निश्चितच होती. ही मानवी प्रगती दर्शविण्यासाठी अश्मयुगाचे पुराणाश्मयुग, मध्याश्मयुग किंवा आंतराश्मयुग आणि नवाश्मयुग असे तीन मुख्य टप्पे कल्पिण्यात आले आहेत. त्यांतही पुराणाश्मयुगाचे पूर्व- पुराणाश्मयुग, मध्यपुराणाश्मयुग आणि उत्तरपुराणाश्मयुग असे पुन्हा तीन उपविभाग पाडले आहेत. या सर्व संज्ञा मुख्यतः यूरोपातील संशोधनांतून उत्पन्न झाल्या. इतर खंडांत प्रागैतिहासिक संशोधनाचा विकास सुरू झाल्यावर असे दिसू लागले, की तेथील प्रगतीची स्तबके काहीशी भिन्न असून वरील संज्ञा त्यांना चपखलपणे लागू पडत नाहीत. नवाश्मयुगापूर्वी पूर्व, मध्य व उत्तर अशी तीनच अश्मयुगे कल्पावी असे आफ्रिका, अमेरिका व भारत येथील काही पुरातत्त्वज्ञ समजत. परंतु स्थलविशेषामुळे उत्पन्न झालेल्या पारिभाषिक संज्ञांचा आशय अद्यापही निश्चित झालेला नाही. म्हणून सर्वत्र यूरोपीय संज्ञाच वापरण्यात आल्या आहेत.


अश्मयुगाच्या उपर्युक्त विभागांची सांस्कृतिक वैशिष्ट्ये स्थूलमानाने पुढीलप्रमाणे होत. यांच्या कालमर्यादांत स्थलभेदानुसार फरक आहेत. 


अश्मयुगीन कालखंड


 पूर्वपुराणाश्मयुग : याचा काळ सामान्यपणे पाच लाख ते दीड लाख वर्षांपूर्वीपर्यंतचा समजण्यात येतो. काही भूप्रदेशांत दहा हजार वर्षांपूर्वीपर्यंत हीच सांस्कृतिक अवस्था चालू होती. या काळात ग्युंझचा (पहिल्या हिमयुगाचा) आरंभ, येथपासून ते रिसच्या (तिसऱ्या हिमयुगाच्या) पहिल्या चरणापर्यंतचा भूस्तरीय काळ समाविष्ट होतो. अत्यंत कडाक्याची थंडी आणि तीव्र उष्णता असे विषम हवामान आणि तेही वारंवार बदलणारे, त्यामुळे पृथ्वीवरील वनस्पतिजीवनात मोठे फेरफार होत गेले. वृक्षराजी, दाट जंगले व गवताळ प्रदेश यांचे पट्टे उत्तर-दक्षिण असे सरकत राहिले. त्यामुळे जीवसृष्टीही बदलत गेली. आता नष्ट झालेले, सरळ दातांचे भीमगज व तत्सम इतर प्राणी, तसेच पाणघोडे, गेंडे, अस्वले, गवे, सांबरे, घोडे, हरणे असे कितीतरी प्राणी मानवाच्या अवतीभोवती वावरत होते. या प्राण्यांची शिकार हेच प्रमुख उपजीविकेचे साधन होते. वंशशास्त्रदृष्ट्या ज्याचा उल्लेख करता येणार नाही, पण तत्सदृश असे ऑस्ट्रेलोपिथेकस (Australopithecus), पिथेकॅन्थ्रापस (Pithecanthropus) व निअँडरथल (Neanderthal) हे मानवसदृश प्राणी पृथ्वीवर वावरत होते. पण त्यांचा वावर भूपृष्ठाच्या एकपंचमांश क्षेत्रापुरताच मर्यादित होता. अमेरिका व ऑस्ट्रेलिया या खंडांत जवळजवळ वस्ती नव्हतीच. सांस्कृतिक दृष्ट्या या माणसांचे पाच गट पाडण्यात येतात. ते असे : व्हिलाफ्रांकिअन (Villafranchian)–पहिल्या हिमयुगाच्या पहिल्या चरणात अबेव्हिलिअन (Abbevillian)–पहिल्या आंतरहिमयुगाच्या पहिल्या चरणात क्लॅक्टोनियन (Clactonian)–पहिल्या आंतरहिमयुगाच्या दुसऱ्या व तिसऱ्या चरणांत अश्यूलियन (Acheulian)–दुसऱ्या आंतरहिमयुगाच्या प्रथमार्धात व लेव्हालेइशियन (Levalloisian)–दुसऱ्या आंतरहिमयुगाच्या उत्तरार्धापासून पुढे. तंत्रविशेषां- वरून समजांचे वरील गट पाडण्यात आले आहेत. त्यामध्ये वांशिक भेद अभिप्रेत नाहीत. पूर्वपुराणाश्मयुगातील दगडी आयुधांत प्रामुख्याने तीन तंत्रे वा तंत्रप्रकार दिसतात. पहिला हातकुऱ्हाडीचा असून त्यात गोट्याच्या दोन्ही बाजूंचे टवके उडवून हत्यारे करण्यात येत. यांत बदामी आकाराचे टोकदार हत्यार हे प्रमुख होते. यावरूनच त्यास हातकुऱ्हाडतंत्र हे नाव पडले. दुसरा प्रकार म्हणजे कोयत्यासारखे किंवा खाटकाच्या सुऱ्या- सारखे तुकडे तोडणारे दगड व तत्सम हत्यारे निर्माण करण्याचे तंत्र होय आणि तिसरा प्रकार दगडी छिलक्यांपासून वरील दोन्ही प्रकारची उपकरणे तयार करणे हा होता. पहिल्या प्रकारचे तंत्र यूरोप, आफ्रिका, पश्चिम आशिया येथे, तर दुसरे तंत्र चीन व आग्नेय आशिया यांत आढळते आणि तिसरे तंत्र प्रथम पॅलेस्टाइन व पुढे वायव्य भारतात दिसते. कालांतराने ते इतरत्रही पसरले. 


मध्यपुराणाश्मयुग: यात पन्नास हजार ते पंचवीस हजार वर्षांपूर्वीचा सर्वसाधारण काळ येतो. तिसऱ्या आंतरहिमयुगाचा उत्तरार्ध आणि व्यूर्मची ( Wurm–चौथ्या हिमयुगाची ) सुरुवात, हे काळ ह्यात समाविष्ट होतात. ह्या काळातील हवामान अतिशीत असल्यामुळे क्वचित अधूनमधून जंगले आढळत. मात्र ह्या काळात उत्तर यूरोपात खुरट्या वनस्पतींचा प्रदेश होता. त्यात गुहांच्या आश्रयाने राहणारे केसाळ गवे, अस्वले, रान- बैल व गेंडे हे मुख्य प्राणी असत. या काळात यूरोप व पश्चिम आशिया या भागांत निअँडरथल मानवाची वस्ती होती. तो मुख्यत्वे गुहांतून वा प्रस्तरालयांतून राहत असे. त्यांतील काही गुहांतून चित्रकाम सापडले आहे. मौस्टेरियन (यूरोप) व लीव्हाल्लॉइसो-मौस्टेरियन (पश्चिम आशिया) हे ह्या काळातील दोन प्रमुख समाजगट होत. त्यांची हत्यारे लहान आकाराची, वाटोळी पण धारदार आणि वैशिष्ट्यपूर्ण होती. ती गोरगोटी दगडांच्या छिलक्यांची केलेली असत. ह्याशिवाय इतर उपकरणांत तासण्या, टोचे, बाणांच्या टोकासारखे लहान हत्यार यांचाही समावेश असे.


उत्तरपुराणाश्मयुग : हा काळ सर्वसाधारणपणे पंचवीस हजार ते दहा वर्षांपूर्वीपर्यंतचा समजण्यात येतो. या काळाचा आरंभ चाळीस हजार वर्षांपूर्वी झाला असावा, असेही एक मत प्रसृत आहे. यूरोपपुरता हा काळ निश्चित असून, चौथ्या हिमयुगात जी तीन हिमप्रसरणे झाली त्यांतील पहिल्या व दुसऱ्या प्रसरणांच्या मधल्या काळात मध्य यूरोप वा दक्षिण रशिया येथे याचा उदय झाला. ह्या काळातील हवा थंड असल्याने या भागातही खुरट्या वनस्पती आढळत. रेनडिअरसारख्या प्राण्यांचे कळप त्यामुळे सर्वत्र वावरत होते. तसेच भीमगजा- सारखे काही काही प्राणी दक्षिण यूरोपात होते. वंशशास्त्रज्ञ ज्याला ‘होमो सॅपियन’ असे नाव देतात त्याच्या क्रोमॅग्नन व कोम्ब कापेल ब्रून मानव ह्या दोन शाखा यूरोपात सर्वत्र पसरल्या होत्या. होमो सॅपियनला पूर्णार्थाने मानव समजण्यात येते. पश्चिम आशियातही ही संस्कृती दिसून येते. इतर खंडांतील या संस्कृतीचे अस्तित्व व स्वरूप याबाबत तज्ञांत एकमत नाही. पेरीगोर्डियन किंवा ऑरिग्नेशियन, सॉल्यूट्रीअन, मग्डलेनिअन हे मुख्य समाजगट त्या वेळी अस्तित्वात होते. नैसर्गिक गुहांचा निवासासाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला जाई. त्यांत काही ठिकाणी चित्रकाम आढळले आहे. पारलौकिक जीवन आणि अतिमानुषी शक्ती यांसंबंधी येथे विचार असावा इतका पुरावा मृतात्म्यासंबंधीची थडगी व विधी ह्यांमधून ज्ञात होतो. गारगोटीच्या दगडाची पातळ व सरळ पाती असलेली संयुक्त आयुधे बनविण्यात येऊ लागली. पानाच्या आकाराची बाणाची टोके, तासण्या, टोचे (Awl-Burin) ही विशिष्ट आयुधेही ह्या काळात वापरात होती. लाकूड व शिंगे यांचाही हत्यारांच्या निर्मितीसाठी वाढता उपयोग करण्यात येऊ लागला होता.


आंतराश्मयुग : ह्याचा पंधरा हजार वर्षांपूर्वी आरंभ होऊन दहा हजार वर्षांपूर्वी त्याचे पूर्ण प्रगल्भावस्थेत रूपांतर झाले. तथापि त्याचे अस्तित्व अत्यंत मर्यादित होते. चौथ्या हिमयुगाच्या तिसऱ्या प्रसरणाच्या काळात ह्यास सुरुवात झाली. थंड हवेऐवजी पर्जन्यमानात हळूहळू वृद्धी होऊ लागली व त्यामुळे गवताळ जंगलांची वाढ झाली आणि जीवसृष्टी सध्यासारखी निर्माण झाली. क्रोमॅग्‍नन मानवाच्या वंशाचा सर्वत्र प्रसार झाला. त्याविषयीचा पुरावा यूरोप व पश्चिम आशिया या भागांत प्रामुख्याने आढळतो. इतर खंडांतील या विशिष्ट सांस्कृतिक स्तबकाचे स्वरूप व विस्तार यांविषयी फारशी माहिती ज्ञात नाही. अझिलियन, टार्डेनोइशिअन, ॲस्टुरियन, एर्टेबोल, पॅलेस्टाइन (यूरोप) नाटुफियन (उत्तर ईजिप्त) हे प्रमुख समाजगट येथे होत. मुख्यत: हे उघड्यावर वा तळ्यांच्या काठी कातडी तंबूंतून निवास करीत. मात्र त्यांपैकी काही गुहांतही राहत असावेत. काही भागांत जमिनीत बोगद्यासारखे खड्डे करून त्यांचा त्यांनी राहण्यासाठी उपयोग केला होता. ‘सूक्ष्मपाषण’ नावाने ओळखली जाणारी गारगोटीच्या दगडाची त्रिकोण, चंद्रकोर इ. विविध आकारांची पाती वापरून ते संयुक्त हत्यारे बनवीत. मांस व आपोआप उगवणाऱ्या धान्याचेही ते भक्षण करीत. ह्या काळात प्राणी माणसाळविण्यास आरंभ झाला असावा.


नवाश्मयुग : ह्या काळास इ.स.पू. आठ हजारांच्या पुढे आरंभ झाला. इ.स.पू. पाच हजारांच्या आसपास त्याची विशेष प्रगती झाली. त्या वेळी हवामान, प्राणी व वनस्पतिसृष्टी सध्यासारखीच होती. मानववंशही बहुधा आज असणारेच होते. बारीक दगडी पात्यांची उपकरणे, घासून गुळगुळीत व धारदार केलेल्या दगडी कुऱ्हाडी, छिन्न्या यांची निर्मिती व वापर ह्या काळात होऊ लागला. चीन व आग्नेय आशिया या भागांतील हत्यारांचे आकार भिन्न आहेत. या भागातील नवाश्मयुगीन संस्कृतीही अनेक दृष्ट्या पश्चिमेकडील तत्कालीन संस्कृतीपेक्षा भिन्न आहे. या वेळी गाय, बैल, डुक्कर,  मेंढी व शेवटी शेवटी घोडा हे प्राणी माणसाळले होते. पशुपालन  हा महत्त्वाचा व्यवसाय सुरू झाला होता. याबरोबरच धान्य पिकविण्याची विद्या मानवाला साध्य झाली असावी. या व्यवसायाचा आरंभ पॅलेस्टाइनमध्ये झाला असावा. कारण आतापर्यंत हाती आलेले याबाबतचे सर्वांत प्राचीन नवाश्मयुगीन अवशेष या भागातीलच आहेत. मानवास शेतीसाठी बराच काळपर्यंत एकाच ठिकाणी राहण्याची जरूर भासू लागली आणि त्यामुळे उपजीविकेला एक प्रकारची शाश्वती आली. म्हणून स्थिर स्वरूपाच्या वसाहतींना प्रारंभ होऊन पहिली खेडी निर्माण झाली. गवत, लाकूड, कच्च्या विटा, दगड यांनी ही घरे बांधलेली असत. काही भागांत (पूर्व आशिया) भूमिगत घरांचाही वापर होता. शेकडो वर्षांच्या वाटचालीतून ह्या स्थिरपद जीवनाचा लाभ झाला. त्या पायावरच नागरी संस्कृतीची कालांतराने उभारणी झाली. धातूंचा शोध लागल्यावर वरील प्रक्रियेला गती मिळाली आणि अश्मयुगाचा अस्तही होऊ लागला. अश्मयुगाचा अस्त प्रथम इ.स.पू. ३००० च्या सुमारास मेसोपोटेमिया व ईजिप्त या ठिकाणी झाला.


👉 स्त्रोत--> https://vishwakosh.marathi.gov.in/26529/


संकलन--> निलेश पाटील 

(मुख्य संपादक/अॅडमिन,परीक्षा विश्व)

मो.9503374833


No comments:

Post a Comment

बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे (बीएआय) अध्यक्ष हिमंता बिस्वा सरमा यांची बीडब्ल्यूएफ परिषदेसाठी निवड.

 ✍️ बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे (बीएआय) अध्यक्ष हिमंता बिस्वा सरमा यांची बीडब्ल्यूएफ परिषदेसाठी निवड. बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे (बीएआय...