इतिहास : अश्मयुगीन काळ --> भाग-2
मानवी जीवन-->
अन्न : मानवी जीविताच्या आद्य निकडींपैकी पहिली अन्न होय. अश्मयुगापैकी पहिल्या दोन खंडांतील मानवाचे मुख्य अन्न म्हणजे त्याच्या भोवताली वावरणारे प्राणी, थोड्याफार प्रमाणात फळेमुळे-वनस्पती. आपले भक्ष्य मिळविण्यासाठी मानवाला त्याच्या शरीरशक्तीपेक्षा बुद्धिबलाचा अधिक वापर करणे भाग होते. कारण भोवतालचे बहुतेक सर्व प्राणी त्याच्यापेक्षा ताकदवान, चपळ होते किंवा त्यांना निसर्गाकडून मिळालेली स्वरक्षणाची साधने मानवाला दूर ठेवण्यास पुरेशी होती. अशा स्थितीत माणसाने टाकलेले पहिले पाऊल म्हणजे गटागटाने शिकार करणे हे होय. अश्मयुगीन मानव ताकदीत भारी असणारा प्राणी कोंडीत पकडून त्यास दगड-धोंड्यांनी ठेचून मारी. पूर्वपुराणाश्मयुगात प्रचंड गवे व गेंडे अशा प्राण्यांना खड्ड्यात फसवून मारण्याची विद्या मानवाने हस्तगत केली होती. असे खड्डे व त्यांत फसलेल्या प्राण्यांची हाडे यूरोपात मिळाली आहेत. मात्र अग्नीचे ज्ञान झाल्यावर गुहांत विसावणाऱ्या श्वापदांना हुसकून बाहेर काढण्यासाठी त्याचा उपयोग केला जात असे. उत्तरपुराणाश्मयुगात रेनडिअर, सांबर, घोडे अशा वेगवान प्राण्यांचे कळप घेरून उंच अशा कड्याकडे वळविण्यात येत. भेदरलेली ही जनावरे धावण्याच्या वेगात कड्यावरून खाली पडत व तेथे थांबलेल्या शिकाऱ्यांच्या हातात ती अलगद सापडत. सांघिक शक्तीचे हे वेगवेगळे प्रयोग अन्नप्राप्तीच्या कामात माणसाला उपयुक्त ठरले. तद्वतच त्याची स्वत:ची संहारशक्ती नवनव्या आयुधांमुळे वाढत गेली. भाले, बोला, धनुष्यबाण इ. शस्त्रांमुळे स्वत: सुरक्षित राहूनही त्यास जास्त परिणामकारकपणे शिकार मिळवणे शक्य झाले. मच्छीमारीसाठी लहान होडगी आणि बांबूची प्रचंड टोपली यांचा उपयोग मानव आंतराश्मयुगात यूरोपमध्ये करीत होता. हाडांचे गळ, काटेरी बाण यांचाही उपयोग मासे व इतर जलचर प्राणी मारण्यास करण्यात येई.
आंतराश्मयुग व नवाश्मयुग यांच्या संधिकाळात मेंढ्या, गाई व इतर काही प्राणी माणसाळवून पाळण्याची विद्या मानवाने साधली. अशा प्राण्यांचे कळप बाळगण्यात येत व त्यांचा उपयोग प्रामुख्याने भक्षणासाठीच होत असे. पाळण्यात आलेले हे प्राणी तृणभक्षकच होते. त्यामुळे त्यांचे कळप घेऊन चराऊ कुरणांच्या शोधासाठी दूरदूर अंतरावर फिरणे त्यास आवश्यक झाले किंवा वर्षभर चारा असेल अशा ठिकाणी त्यास स्थायिक व्हावे लागले. पशुपालनाची ही अवस्था अगदी प्राथमिक असली, तरी तिची मुख्य फलनिष्पत्ती अन्नाची शाश्वती हीच होय.
याच्याच आसपास केव्हा तरी शेतीचा शोध लागला असावा. आरंभी मुद्दाम पेरण्यात आलेले धान्य म्हणजे गहू असावे. रानटी गव्हाच्या लोंब्या जमिनीवर पडतात, तेथे पुन्हा रोपे उगवतात, तेथेच नवा गहू येतो, हे जीवितचक्र माणसाच्या ध्यानात आले असावे. फळे, कंदमुळे गोळा करण्याचे काम मुख्यत: स्त्रियांकडे आले व हे निसर्गाचे चक्र प्रथम त्यांच्यात लक्षात आले असावे. कदाचित स्त्रियांनीच धान्य पेरण्यास आरंभ केला असावा. हा शेतीचा म्हणजे पर्यायाने नवाश्मयुगाचा आरंभ होय.
शिकार, मच्छीमारी, पशुपालन व नंतर शेती हे अश्मयुगीन माणसाचे क्रमश: मुख्य व्यवसाय होते. पुराणाश्मयुगात व आंतराश्मयुगात मात्र फक्त पहिले दोनच व्यवसाय होते. नवाश्मयुगात पशुपालन व शेती हे प्रधान व्यवसाय झाले, तरीही थोड्याफार प्रमाणात शिकार व मच्छीमारी होतच राहिली. त्याच्या जीविताच्या इतर शाखांचे स्वरूप बऱ्याच अंशी त्याच्या व्यवसायांवरून निश्चित झालेले दिसते.
अश्मयुगाच्या विविध अवस्थांत मानवी अन्नाचे रूपही पालटत गेले. पुराणाश्मयुगीन व आंतराश्मयुगीन माणसाच्या अन्नात सर्व प्रकारच्या लहानमोठ्या प्राण्यांचा आणि फळे व कंदमुळे यांचा समावेश होता. मोसमात व विशिष्ट प्रदेशात सापडणारे सर्व प्रकारचे लहान-मोठे प्राणी खाद्य होते इतकेच काय, फार जरूर वाटल्यास नरमांसभक्षणही होत असे. एरवी हरणे, डुकरे, हत्ती, भीमगज, अस्वले, घोडे हे प्राणी नित्याचे भक्ष्य होते. आंतराश्मयुगात याशिवाय मासे व इतर जलचर यांचा अन्नात समावेश झाला. या युगाच्या शेवटी शेळ्या-मेंढ्या, गायी-बैल यांसारख्या पाळीव जनावरांचे मांस हा आहाराचा एक भाग झाला. नवाश्मयुगात धान्या- बरोबरच मांसाहारही चालूच राहिला.
शेती करण्यास आरंभ झाल्यावर गहू, बार्ली, मका, ज्वारी, बाजरी, राय ही धान्य व वाटाणा, घेवडा, मूग, हरभरा व मसूर यांसारखी द्विदल धान्ये स्थलकालपरत्वे पिकविण्यात येऊ लागली. तेल मिळविण्या- साठी ऑलिव्हसारख्या फळांचा वापर आग्नेय स्पेनमधे होत असे. नासपती, सफरचंद, बोरे अशांसारखी फळेही या माणसाला उपलब्ध होती. पण त्यांची मुद्दाम लागवड केलेली नसे. पाळीव जनावरांत शेळ्या, गाई व डुकरे ही मुख्य असत. यांच्या मांसाचा खाण्यासाठी उपयोग होई. लामा, उंट, घोडा ही इतर पाळीव जनावरे वेळप्रसंगी भक्षणासाठी उपयोगी पडली, तरी मुख्यत्वे त्यांचा उपयोग वाहतुकीसाठीच होत असे.
समाजरचना : अश्मयुगीन समाजरचनेविषयी उत्खननातून मिळणारा पुरावा अप्रत्यक्ष व अल्प आहे. मिळालेल्या अवशेषांवरूनच काही अनुमाने बांधावी लागतात. या अनुमानांना बळकटी आणण्यासाठी, आजच्या मानवसदृश प्राण्यांची वागणूक (गोरिला, चिंपांझी इ.) आणि आजही अत्यंत मागासलेल्या, रानटी परिस्थितीत राहणाऱ्या जमातींविषयीची माहिती यांचा उपयोग करून घ्यावा लागतो. हे सगळे करूनही अश्मयुगीन समाजव्यवस्थेसंबंधी अत्यंत त्रुटित अशीच माहिती उपलब्ध होते.
आधीच हे स्पष्ट करावयास पाहिजे, की वैचारिक देवघेवीचे मुख्य साधन जी भाषा, ती त्या कालखंडात केव्हा व कोणाकोणाला प्राप्त झाली होती, याविषयी काहीही निश्चित सांगता येत नाही. परंतु पूर्वविचार व योजना, तसेच पुरस्सर सामूहिक जीवन प्रचलित होते. त्यावरून असे काहीतरी माध्यम अस्तित्वात असावे हे नक्की. शिकार करणे हे एकट्या-दुकट्याचे काम नसून त्यासाठी सांघिक प्रयत्न जरूर होते. तेव्हा पहिल्या- पासूनच मानवाला गटात किंवा टोळीत राहावे लागले आहे. या गटास कोठल्या माणसांचा समावेश होत असावा व या गटाची रचना कशी असावी, हे प्रश्न विवाद्य आहेत. केवळ मूळ उद्देशाकडे लक्ष ठेवून विचार केला, तर कोणाही धडधाकट माणसाचा त्यात समावेश व्हावा व सगळ्यांत अनुभवी शिकाऱ्याच्या हुकमात सगळ्यांनी चालावे, ही सरळ उत्तरे आहेत. पण मानवी जीवनातील कोणताच प्रश्न इतका सरळ सुटत नाही. केवळ एखाद्या मोठ्या शिकारीला वा शिकारीच्या एखाद्या मोसमात माणसे एकत्र येण्याऐवजी काही शाश्वत असे ऐक्य आरंभापासून अधिक प्रचलित असावे व हे ऐक्य सामाजिक बंधासारखे असावे. रक्ताचे नाते असणारी माणसे एकेका गटात असावी आणि हा कौटुंबिक गट असावा. पण या वेळी ‘कुटुंब’ याचा नेमका काय अर्थ असावा, याचा उलगडा होत नाही. यात एकाच पित्याची प्रजा होती, की एकाच मातेची प्रजा होती? अश्म- युगीन स्त्रीमूर्ती व चित्रे यांवरून काही तज्ञ असा निष्कर्ष काढतात, की येथे मातृसावर्ण्य होते. अपत्यप्राप्तीतील मातेच्या कार्याची साक्षात कल्पना या समाजाला होती. परंतु इतर अनेक मागासलेल्या समाजांप्रमाणे, प्रजोत्पादनातील पुरुषाचा नेमका वाटा कोणता? याची कल्पना अश्मयुगीन समाजाला नसावी. म्हणून मातेला, म्हणजे स्त्रीला, अधिक महत्त्व असावे. या प्रश्नाची दुसरी बाजू अशी, की या समाजातील स्त्रीपुरुष- संबंधाविषयीही कसलीच माहिती उपलब्ध नाही. कदाचित आजही जे प्राणिसृष्टीत दिसते, त्याप्रमाणे त्या वेळी एक बलिष्ठ पुरुष असावा. त्याच्या चारपाच स्त्रिया व बाल्यावस्थेतील अपत्ये एवढ्यांचा कुटुंबात समावेश असणे स्वाभाविक होतो. नव्याने वयात येणाऱ्या स्त्रीपुरुषांना–विशेषत: पुरुषांना –या व्यवस्थेत सामावून घेणे हा नेहमीचा प्रश्न राहणार. मग हे तरुण, आपल्या अथवा शेजारच्या कुटुंबातील स्त्रियांना वश करून घेऊन, स्वतंत्र कुटुंबे स्थापतील. म्हणजे पितृ-किंवा मातृ-सावर्ण्य यांपैकी कोणतीही पद्धत प्रचलित असू शकेल. अशी कुटुंबे एकत्र येऊन त्यांचा पुढे गट निर्माण होत असे. व्यावहारिक गरज व स्त्रीपुरुषसंबंध या दोन्हींची अशी सांगड घातली जात असणे सुसंगत व संभाव्य ठरते. या एकेका गटाचे सर्व घटक तेथे असतीलच असे म्हणवत नाही. तथापि एखाद्या विशिष्ट प्रदेशात राहणारी काही कुटुंबे व्यावहारिक सोयींसाठी एकत्र गट करीत असतील. या गटाचे निष्ठास्थान रक्तसंबंध नसल्याने काही दृश्य चिन्ह असणे उपकारक ठरेल, म्हणून एखाद्या प्राण्याचा किंवा पक्ष्याचा, निशाणी वा गणचिन्ह म्हणून उपयोग होऊ लागला. गुहांच्या भिंतींवर अस्वले, गेंडे अशा प्राण्यांची जी चित्रे दिसतात ती गणचिन्हेच समजता येतील. अशा गटात तीसपासून साठापर्यंत माणसे असावीत. ही सगळी एकत्र राहत, तसेच त्यांचे खाणेपिणेही एकत्रच होत असे. शिकारीसाठी म्हणून एखादा विशिष्ट भूप्रदेश एकेका गटाने राखून ठेवलेला असण्याची शक्यता असावी.
गटातील माणसे कोणती कामे करीत होती, याचे अगदी स्थूलमानाने विवेचन करता येईल. शिकार हा प्रमुख व्यवसाय पुरुषमंडळी करीत, तर फळे, मुळे, कंद हे गोळा करण्याचे काम स्त्रिया व मुले यांजकडे असे. मांस भाजून खाण्यास आरंभ झाल्यावर तेही स्त्रियांचेचे काम झाले असावे. स्त्रीचे सगळ्यात महत्त्वाचे कार्य बालसंगोपन हे होय. मानवी अपत्य दोनतीन वर्ष पूर्णपणे परावलंबी असते हे ध्यानात घेतले म्हणजे बाल- संगोपनात स्त्रीला लागणाऱ्या वेळाची व श्रमाची सार्थ कल्पना येईल. दगडी हत्यारे व उपकरणे तयार करणे हे काम पुरुषांचे होते. पंचमहाभूते, वृक्ष, स्थलदेवता, मृतात्मे यांसारख्या अतिमानुषी शक्तींवर ताबा चालविणाऱ्या पुरोहिताचा व्यवसाय गटाचा नायक किंवा वयोवृद्ध स्त्री वा पुरुष यांपैकी कोणीही करीत असे.
उत्तरपुराणयुगातील व आंतराश्मयुगातील गुहांच्या भिंतींवरील चित्रे, त्यांत सापडणाऱ्या स्त्रीमूर्ती, हाडे व शिगें यांवरील कोरीवकाम, अशा कलावस्तूंची निर्मिती हा या कालखंडात प्रचलित झालेला आणखी एक व्यवसाय होय. यांतील बरीच चित्रे व मूर्ती धार्मिक विधींशी निगडित होत्या. तेव्हा त्यांची निर्मिती करणारी माणसे अर्थातच समाजाने पोसलेली असावीत, असे दिसते. याच काळात हत्यारांसाठी गारगोटीसारखे दगड वापरू लागले. हे दगड निरनिराळ्या गटांना पुरविणे हाही एक स्वतंत्र व्यवसाय उदयास आला असावा. उत्तरपुराणाश्मयुगीन व आंतराश्मयुगीन हत्यारे आकाराने लहान पण वैविध्यपूर्ण होती. ती तयार करण्यास विशेष कौशल्याची आवश्यकता असल्याने अशा कारागिरांना साहजिकच गटात स्वतंत्र स्थान व महत्त्व प्राप्त झाले असावे.
एकीकडे रक्तसंबंध आणि व्यावहारिक गरज यांमुळे निर्माण होणारे ऐक्य, दुसरीकडे स्त्रीपुरुषसंबंधातून उत्पन्न होणारे व व्यवसायप्रावीण्यापोटी उद्भवलेले ताण, यांच्या संघर्षातून समाजगट टिकविण्याची व्यवस्था काय असावी? या संदर्भात व्यवहारचातुर्य व औदार्य यांच्या जोडीला दंडशक्तीचीही गरज असली पाहिजे. ह्या दंडशक्तीचा वापर करण्याचे काम पुरोहिताकडे असावे. अतिमानुषी शक्तीवरील श्रद्धेचा उपयोग सामाजिक ऐक्य टिकविण्यास होत असे. याला परंपरा व रूढी यांचा चांगलाच आधार मिळत असावा.
नवाश्मयुगात उपजीविकेच्या साधनांत मूलभूत क्रांती घडून आली. पशुपालन अथवा शेती यांमार्गे होणारी अन्नप्राप्ती आणि शिकारीतून होणारी प्राप्ती यांत एक फार महत्त्वाचा फरक आहे. या भेदाचे परिणाम दूरगामी ठरले. शिकार मिळविण्यास फार तर एकदोन किंवा तीनचार दिवस जात, परंतु एकदा मेलेला प्राणी हाताशी आला, की लगेच खाता येई शिकार करणे हे काम सतत चालू असले, तरी त्यातून फलप्राप्ती जवळजवळ तत्काळ होत असे. आता मेंढ्या वा गुरांचे कळप बाळगावयाचे म्हणजे, गुरे वाढवावयास हवीत. शेतात धान्य पेरल्यानंतर प्रत्यक्ष धान्य हाती येईपर्यंत तीन ते सहा महिने इतका काळ वाट पाहत बसावयास पाहिजे. तसेच धान्य पेरण्याच्या आधी त्या जमिनीची मशागत केली पाहिजे. माणसाचे अवधान सतत त्याच गुरांच्या कळपावर पाहिजे, त्याच जमिनीच्या तुकड्यावर पाहिजे. यामुळे अधिकाधिक आपुलकी निर्माण झाली व तिचेच रूपांतर स्वामित्वाच्या भावनेत झाले. याचीच दुसरी बाजू अशी, की कळपातील गुरांपासून अन्न मिळणार ते त्यांची जोपासना करणाऱ्याला–दुसऱ्याला नव्हे. म्हणजे उपजीविकेच्या साधनांवर मालकी हक्काचा उदय झाला. आरंभी ही मालकी प्रत्येक गटाची सामूहिक होती. नंतर कुटुंब हा महत्त्वाचा दुवा झाला आणि शेवटी तेथे व्यक्ती आली. एकेका व्यकीच्या मालकीचे कळप किंवा शेतजमीन या वेळी नव्हती पण एकेका कुटुंबाच्या सर्वस्वी मालकीची स्थापना मात्र झालेली दिसते. याचे साधे कारण असे, की कोणाही व्यक्तीला अधिकार आणि कर्तव्य यांची सर्वांत फायदेशीर जोड कुटुंब या समूहाद्वारेच मिळण्यासारखी होती. जमिनी वर्षानुवर्षे टिकवून धरावयाच्या याचाच अर्थ वारसा म्हणून त्या मिळावयाच्या, तर तो अधिकार कोणाचा हे स्पष्ट करणे म्हणजे कुटुंब या संस्थेचे रूप नक्की ठरणे आवश्यक होते. नवाश्मयुगाच्या आरंभीच्या काळात पितृसावर्ण्य रूढ झाले. आता पुराणाश्मयुग व आंतराश्मयुग यांतल्यासारखी स्थिती राहिली नाही. या कालखंडातील माणसाला एकाच ठिकाणी स्थायिक होणे अत्यावश्यक झाले. केवळ पशुपालन व मेंढपाळी करणाऱ्या लोकांना चराऊ कुरणाच्या शोधार्थ थोडीशी भ्रमंती करावी लागत असली, तरी पशुपालन व शेती असे दोन्ही व्यवसाय करणारे लोक कायमचे एकत्र राहू लागले.
दगडाची हत्यारे करणे, त्याला आवश्यक ते दगडाचे प्रकार मिळविणे, थोड्याफार प्रमाणात शिकार करणे, तसेच पौरोहित्य, कलाकृती हे सर्व व्यवसाय पूर्वीप्रमाणेच आताही चालू राहिले. मात्र शेतकी आणि पशुपालन यांसंबंधीची तंत्रे अंगी आणणे जरुरीचे झाले. हेच सर्वसाधारण व्यवसाय असल्याने बहुतेक स्त्रीपुरुष यांत तरबेज झाले. आता नवीन व्यवसाय आले. घरे बांधणे, त्यासाठी सुतारकाम-गवंडीकाम आले वस्त्रे विणणे आणि नवाश्मयुगाच्या उत्तरार्धात मृत्पात्रे तयार करणे ह्याही गोष्टी आल्या. यांतील वेतकाम, बुरूडकाम यांसारखे काही पूर्वापार व्यवसाय होते. त्यांत वस्त्रे विणणे याची भर पडली. मृत्पात्रे तयार करणे, ती रंगविणे हे व्यवसाय स्त्रियाही करीत. सर्व लोक निरनिराळे व्यवसाय करीत होते. पण निरनिराळ्या उत्पादनांची गुणवत्ता पाहिल्यानंतर असे वाटते, की प्रावीण्य मिळविलेल्या माणसांचेच हे काम असले पाहिजे. म्हणजे व्यवसाय व त्यातील प्रावीण्य यांच्या अनुषंगाने समाजाची व्यावसायिक विभागणी झाली होती. असे कुशल कारागीर एकाच गावात राहत की इतर गावांत काम करीत, हे ज्ञात नाही. परंतु व्यावहारिक सोयीच्या दृष्टीने पाहिल्यास ते फिरते असण्याचा अधिक संभव वाटतो. फिरत्या कारागिरांच्या पाठोपाठ फिरते व्यापारीही आले असावेत. इतकी कुटुंबे कायमची एकत्र राहू लागली. गुरेढोरे, शेतजमिनी यांवर कौटुंबिक (खाजगी) मालकी निर्माण झाली. तंत्रज्ञांमुळे काही व्यवसायांवर एखाद्या कुटुंबाची वा माणसाची मक्तेदारी आली. म्हणजे साहजिकच संघर्ष-प्रसंगांची शक्यता वाढली. आतापर्यंत सामाजिक संघर्षाला पोषक असे घटक अश्मयुगीन समाजात नव्हते. अतिमानुषी शक्तीवर श्रद्धा, मृतात्मे, पुरोहित, वडीलधारी माणसे, परंपरा यांचे समाजावर नियंत्रण होतेच. परंतु आता दंडनीती आणि शासनसंख्या अत्यावश्यक झाली. याच संस्थेकडे समाजाचे व त्याच्या मालमत्तेचे बाह्यशत्रूकडून रक्षण करण्याचे दायित्वही आपोआप आले. अशी संस्था कोणत्याही स्वरूपाची असेल त्यावर वडिलधाऱ्या मंडळीची सभा, एक वयोवृद्ध वा अनुभवी पुढारी-धर्मगुरू (पुरोहित) प्रमुख म्हणून असावा.
शेवटी नवाश्मयुगीन समाज शाश्वत पायावर उभा राहून समाजरचनेत महत्त्वाचे बदल घडले आणि कुटुंब ही संस्था श्रेष्ठ ठरली. यातून नियंत्रणाची गरज निर्माण होऊन शासनसंस्थाही याच काळात उत्पन्न झाली असावी. तिचा आवाका लहान असला, तरी मूलभूत लक्षणे तेथून दृग्गोचर होऊ लागतात. या समाजा- च्या तंत्रज्ञानाविषयी बरीच माहिती उपलब्ध झाली आहे.
👉 स्त्रोत--> https://vishwakosh.marathi.gov.in/26529/
संकलन--> निलेश पाटील
(मुख्य संपादक/अॅडमिन,परीक्षा विश्व)
मो.9503374833
No comments:
Post a Comment