इतिहास : अश्मयुगीन काळ,भाग-3
जीविताच्या इतर शाखांप्रमाणे याही क्षेत्रात नवाश्मयुगात क्रांतिकारक बदल झालेले दिसतात. नव्या जीवनपद्धतीत स्थिर वस्ती ही समाजाची गरज झाल्याने जास्त टिकाऊ निवासस्थाने आवश्यक झाली. स्वाभाविकच चिवट व बळकट सामान कौशल्याने वापरण्यात येऊ लागले. लव्हाळे, बांबू, कातडी यांच्या ऐवजी आता मोठाले लाकडी ओंडके, दगड, कच्च्या विटा यांचा उपयोग होऊ लागला. नवाश्मयुगीन निवासस्थानांत स्थलकालपरत्वे खूपच वैविध्य आढळते. घरांचा आराखडा आता गोल, चौरस वा आयत अशा आकारांचा झाला. मध्याश्मयुगातही भिंत हा घटक फारसा कोठे आढळत नाही. आता बांबूच्या-वेताच्या तट्ट्यापासून, दगड, कच्च्या विटा यांच्या बांधलेल्या अशा सगळ्या प्रकारच्या भिंती दिसून येतात. या भिंतींवर गिलावा करून त्यावर रंगकामही केलेले आढळते (जार्मो). भिंती भक्कम करण्यासाठी त्यांखाली दगडी जोती ठेवण्याच्या प्रथेचाही आरंभ झालेला दिसतो (जार्मो). भोवतालच्या जमिनीपेक्षा घराची जमीन थोडीशी खोलगट करण्याची प्रथा आताही बऱ्याच भागांत चालूच राहिली. छपराचे स्वरूप मुख्यत्वे बांधकामाची साहित्यपद्धती व पर्जन्यमान यांवरच अवलंबून राहिले. पावसाळी भागात लाकडी उतरती वा दगड-विटा यांची घुमटाकार व इतरत्र सपाट अशी छपरे इमारतींवर असत. ⇨जेरिको (पॅलेस्टाइन), खिरोकिटिया (सायप्रस), हसौना (उ. मेसोपोटेमिया) हे अवशेषांचे त्याबाबतचे नमुने होते. कालांतराने घरांमध्ये एकच दालन ठेवण्याऐवजी त्याच्या खोल्या पाडण्यात येऊ लागल्या. सायप्रसमधील खिरोकिटिया येथील वर्तुळाकार घरात पोटमाळा काढलेला होता. त्याला पक्क्या खांबांचा आधार होता, तरीही जिना मात्र पक्का नव्हता. तेथे साध्या शिडीचाच उपयोग केलेला असावा. उपलब्ध जागेच्या विभाजनाचा हा एक स्वतंत्र व फारसा रूढ न झालेला प्रकार. खोल्यांची कल्पना रुजल्यावर कित्येक ठिकाणी समोर ओवरी, त्यामागे एकापाठोपाठ एक अशा दोन खोल्या, अशीच मांडणी हलाफ (सिरिया) येथील अवशेषांवरून दिसते. यापुढे हसौना येथे एका उघड्या चौकाभोवती अनेक खोल्या मांडलेल्या दिसतात. सर्व खोल्यांना हवा व उजेड पोचण्यास ही योजना उपयुक्त होती, तसेच सगळ्यांभोवती एक मोठी भिंत असल्याने सगळे घर सुरक्षित राही. आर्पाकिया (उत्तर इराक) या ठिकाणी घरांची थोडी निराळी रचना सापडते. वर्तुळाकार रचनेचीच ही थोडी सुधारलेली आवृत्ती असावी. या घराचे दोन भाग दिसतात. एक वर्तुळाकार दालन व त्याच्या समोर आयता- कार दालन दिसते. या दालनाला प्रवेशद्वार असावयाचे. पण हा आराखडा अपवादात्मक होय.एरवी गृह-रचनेच्या विद्येतील सर्व मूलभूत घटक–वास्तुसाहित्य, वास्तुरचना, तंत्र, वास्तुविधान व सुशोभन–नवाश्म- युगीनांनी आत्मसात केलेले दिसते. वास्तुविद्येची ही सर्व प्रगती मुख्यत्वे पॅलेस्टाइन, तुर्कस्तान, इराक या भागांत व भूमध्य समुद्रातील काही बेटांत झाली, हे ध्यानात घ्यावयास हवे. कारण साधारणत: याच भागात नवाश्मयुगीन संक्रमण सिद्धीस पोचले असावे, असे समजतात.
यूरोप, चीन, भारत व ईजिप्त या ठिकाणी नवाश्मयुगीनांनी बांधलेली घरे बरीचशी निराळी आहेत. यूरोप- मध्ये गृहरचनेस लाकडाचाच उपयोग होत गेला. आयताकार वा चौरस घरे भक्कम लाकडी किंवा बांबूच्या सांगाड्याभोवती बांधीत. भिंती आणि बहुधा छपरेही फळ्यांची केलेली असत. क्वचित त्यांवर गवत पसरीत (फेडर्झे, कोलोन-लिंडन्थॉल), ईजिप्तमध्ये फायूम येथे बांबू व तट्ट्या यांच्या झोपड्या वापरीत असावेत असे दिसते. यानंतरच्या मेरिम्डीयन समाजाने अशा झोपड्यांची छपरे घुमटाकार बनवून त्यांवर चिखल थापण्यास आरंभ केला. चीन व भारत या दोन्ही ठिकाणी सामान्यपणे लाकूड व गवत यांच्या वर्तुळाकार वा चौकोनी झोपड्या वापरलेल्या दिसतात (टेक्कलकोटा). क्वचित प्रस्तरालयाचाही आश्रय केलेला होता. परंतु चीनच्या शान्सी व भारताच्या काश्मीर भागात खड्ड्यांत केलेली घरे या काळात वापरीत.
आंतराश्मयुगात काही ठिकाणी पाचसात घरांचे समूह दिसले, तरी त्या वेळी ग्राम या कल्पनेचा जन्म झाला नव्हता. नवाश्मयुगात बरीच माणसे कायमची एका ठिकाणी राहणार, म्हणजे बरीच घरे एकमेकांशेजारी बांधली जाणार, असे झाल्यावर या सहवासाचा अर्थ व त्यातील प्रश्न समजावयास लागले. या माणसांना ये-जा करण्यास मार्ग हवेत, म्हणजे रस्ते हवेत. नवाश्मयुगातील बर्याच मोठ्या कालखंडात रस्ता ही कल्पना ज्ञात नव्हती. दोन घरांच्या मध्ये उरणाऱ्या जागेतूनच दळणवळण चाले. हे सोयीचे करण्याचे प्रयत्न क्वचित काही ठिकाणी झालेले दिसतात. आर्पाकिया येथे अशा वाटांवर दगड अंथरले होते, तर खिरोकिटिया येथे मुख्य रस्त्यावर फरसबंदी केलेली होती. परंतु ही उदाहरणे अपवादात्मक होत. यूरोपातील काही वसाहतींत (फेडर्झे) घरे एका ओळीत बांधून मध्यभागी हेतुत: रस्ते ठेवलेले दिसतात. इतरत्र अशी योजनापूर्वक मांडणी सापडत नाही. वाहने नसल्याने खेड्यांना एकमेकांशी जोडणारे रस्ते निर्माण होण्याची शक्यताच नव्हती. खेड्यांच्या रक्षणासाठी काही बांधकाम करण्याची व्यवस्था नवाश्मयुगात प्रथम झाली. इ.स.पू. आठव्या सहस्रकात जेरिको येथे एक प्रचंड दगडी तटबंदी उभारण्यात आली होती. पण हेही एकुलते एकच उदाहरण आहे. नवाश्मयुगाच्या अगदी शेवटी शेवटी भूमध्य सागराभोवतालचा प्रदेश व पश्चिम आशिया या भागांतील काही ठिकाणी विटांच्या तटबंद्या बांधण्यात आल्या (मर्सीनू, हसितकार, ट्रॉय). उत्तर व मध्य यूरोपातील वसाहतींभोवती लाकडी तटबंद्या व खंदक आढळले आहेत (कोलोन-लिंडन्थॉल). फ्रान्समध्ये काही टेकड्यांच्या माथ्याभोवती असणाऱ्या दगडी भिंती याच काळातील समजतात. ही सर्व उदाहरणे फुटकळ आणि काळ व स्थळ या दोन्ही दृष्टींनी एकमेकांपासून दूरची आहेत. म्हणून ग्राम अस्तित्वात आले, तरी ग्राम-योजना व ग्राम-संरक्षण या कल्पनांचे आकलन झाले होते किंवा त्या रुजल्या होत्या, असे निश्चितपणे म्हणता येत नाही.
दळणवळणासाठी वाहने वापरली जात असल्याची शक्यता असली, तरी प्रत्यक्षात वाहने होती किंवा कसे आणि असल्यास त्यांचे स्वरूप काय असावे, हे सांगता येत नाही. प्राणी माणसाळविलेले असल्याने ओझे लादून नेण्यास वा बसून जाण्यास उपयोगी होत असावेत. उत्तरपुराणाश्मयुगात होड्या करता येऊ लागल्या होत्या. नदीत अगदी थोड्या अंतरावर जाऊन मच्छीमारीसाठी त्यांचा वापर होई. नवाश्मयुगात होड्या होत्याच. त्यांचा आकार थोडा वाढला होता. या काळाच्या शेवटी कदाचित शिडीही वापरण्याची विद्या मानवाला साध्य झाली असावी.मात्र ही प्रगती पूर्णपणे स्थानिक होती. ती नाईल नदीवरील प्रवासापुरतीच मर्यादित होती.
स्त्रोत--> https://vishwakosh.marathi.gov.in/26529/
संकलन--> निलेश पाटील
(मुख्य संपादक/अॅडमिन,परीक्षा विश्व)
मो.9503374833
No comments:
Post a Comment