स्पर्धा परीक्षासंबंधी माहिती मिळवण्यासाठी आमच्या 'परीक्षा विश्व' ब्लॉगला भेट द्या

Friday, September 25, 2020

इतिहास : अश्मयुगीन काळ,भाग-4-->

 इतिहास : अश्मयुगीन काळ,भाग-4-->


👉हत्यारे व आयुधे:--> आपल्या अंगातील नैसर्गिक शक्तीला भोवतालच्या पदार्थांची जोड देऊन स्वत:ला अधिक कार्यक्षम बनविणे हा कोणत्याही मानवी तंत्रज्ञानाचा प्राथमिक उद्देश असतो. अश्मयुगात मानवाने लाकडे, हाडे व मुख्यत: दगड यांचे साहाय्य घेतले. त्यापासून आपल्या उपयोगी पडतील अशी उपकरणे व आयुधे घडविण्यास त्याने आरंभ केला. किंबहुना उपकरणे व आयुधे वापरण्याची बुद्धी व ती तयार करण्याची शक्ती ही मानवाची व्यवच्छेदक लक्षणे समजावी लागतात. अश्मयुगातील तंत्रविषयक प्रगतीच्या दिशा पुढीलप्रमाणे होत : एखाद्या विशिष्ट कामाला विशिष्ट आकाराचीच उपलब्ध वस्तू (दगड) जास्त उपयोगी पडते ही जाणीव त्यास झाली. ही जाणीव एकाएकी प्राप्त न होता अनुभवातूनच उत्पन्न होते. त्यामुळे विशिष्ट आकाराच्याच दगडांची निवड करून, हव्या त्या आकारांचे दगड न मिळाल्यास, जे दगड हाताशी असतील त्यांना मनाजोगता आकार देण्यास त्याने सुरुवात केली.यासाठी दगडाचे टवके व तुकडे उडविणे व योग्य आकार देणे त्यास क्रमप्राप्तच होते. पूर्णपुराणाश्मयुगाच्या आरंभापासूनच येथपर्यंत त्याने मजल मारलेली दिसते.दगडाचा आकार जसा निवडता आला, तसाच त्याचा प्रकारही मानव निवडू लागला.ठिसूळ

 दगडांचे आडवे कातळ निघू शकतात, हेही ज्ञान त्यास होऊ लागले. त्याचप्रमाणे तो उपकरण-प्रकाराला जास्त अनुकूल असा दगडाचा प्रकारच निवडू लागला. पुराणाश्मयुगाच्या मध्य व उत्तर खंडांत त्यास अशी पारख पूर्णत्वाने प्राप्त झालेली दिसेत. लहान आकाराचे छिलके व पाती यांसाठी चर्ट (Chert), ॲगेट (Agate) असे अत्यंत घट्ट व एकसंध पाषाणप्रकार त्याने निवडलेले दिसतात. निवडलेल्या पाषाणप्रकारांतून अपेक्षित आकार घडविण्याच्या पद्धतींत पुढे वैविध्य आले व प्रगती झाली. बदामी आकारचे व बहुविध उद्योगांचे ‘हातकुऱ्हाड’ नावाचे हत्यार तयार करण्याच्या दोन पद्धतींवरून हा मुद्दा जास्त स्पष्ट होईल. अबेव्हिलियन पद्धतीत दगडाचे मोठाले टवके उडवीत, त्यामुळे आयुध ओबडधोबडच राहत असे. अश्यूलियन पद्धतीत टवके उडवून हलकेहलके इष्ट आकार घडवीत. त्यामुळे सलग व धारदार अशी कड व अणकुचीदार टोक तयार होई. केवळ दगडाचे आयुध वापरण्याऐवजी त्याला लाकडी किंवा हाडाच्या दांड्याची जोड द्यावी, हे ज्ञान त्यास होऊ लागले. दगडी हत्यार काठीला वा हाडाला बांधून दांड्यात भोक पाडून त्यात दगड, किंवा दगडात भोक पाडून त्यात दांडा, तो अडकवू लागला. दांड्याला खाचा पाडून त्यात तो दगड बसवू लागला. त्यामुळे कुऱ्हाडी, विळे, बाण असे संयुक्त आयुध बनू लागले. उत्तरपुराणाश्मयुगापासून पुढे संयुक्त आयुधे विशेष प्रचलित झालेली दिसतात. यासाठी दगडाच्या लहान आकाराच्या छिलक्या व पाती तयार करण्यास या वेळेपासूनच प्रारंभ झाला होता. आंतर व नव या दोन अश्मयुगांत या छोट्या पात्यांचा उपयोग करून हरतऱ्हेची संयुक्त आयुधे बनविण्यात मानवास प्रावीण्य प्राप्त झाले. बाण, सुऱ्या, विळे, खुरपी अशी अनेकविध उपकरणे आता तयार झाली. लहानलहान भाग एकत्र आणून आयुध तयार करण्याची ही पद्धती पूर्वीच्यापेक्षा अधिक वेळ खाणारी व विशेष कौशल्याची होती. परंतु यामुळे उत्पन्न झालेली आयुधे विविध प्रकारची तर होतीच, पण कार्यक्षमही होती. उपकरणे वा आयुधे यांच्या निर्मितितंत्राची उत्क्रांती विचारपूर्वक किंवा पूर्व-

योजनेप्रमाणे झाली नाही. गरजा, उपलब्ध सामग्री आणि परंपरागत ज्ञान यांच्या समन्वयातून ती होत गेली. उदा.,  पुराणाश्मयुगात मुख्यत: घातक आयुधे तयार झाली, तर नवाश्मयुगात शेतकी व्यवसायाला उपयोगी अशी विळा, खणण्याची काठी ही अवजारे तयार होत होती. क्षेपणायुधांत भाला, भालाफेकीची काठी, बोला, धनुष्यबाण व गोफण ही सर्व प्राणघातक आयुधे होती. मुख्यत: शिकारीसाठी वापरण्यात येणारे आयुध म्हणजे भाला. टोकदार काठी हेच भाल्याचे पहिले रूप होय. टोक भाजून, टणक करून, टोकाला दगडी फाळ लावून ते केलेले असे. हे भाले जास्त दूरवर फेकता यावेत म्हणून त्यांच्या एका टोकाला उंचवटा असणारी काठी उत्तरपुराणाश्मयुगात काही ठिकाणी वापरात आली. तीनचार कातडी वाद्यांच्या टोकांना गोल गोटे बसवून त्यांची दुसरी टोके एकत्र बांधलेले आयुध म्हणजे ‘बोला’. आपल्या डोक्यावर ते गरगर फिरवून जोराने भिरकावून दिले, की चक्रासारख्या फिरणाऱ्या या गोट्यांच्या तडाख्यात एखादा मोठा पक्षी सापडे किंवा त्यात श्वापदाचे पाय गुंतून ते हाती लागे. धनुष्यबाणाच्या उपयोगास आंतराश्मयुगापासून आरंभ झाला असावा. धनुष्याला कातडी वादी लावीत. बाणाला दगडाची किंवा हाडांची टोके बसवीत. गोफण हे एक प्रभावी क्षेपणायुध नवाश्मयुगात गवसले.  त्यास दगड नसले तर मातीचे भाजून पक्के केलेले गोळे वापरीत असत. लाकडे व हाडे यांचा स्वतंत्र उपकरणांच्या निर्मितीसाठीही उपयोग केलेला आढळतो. लाकडाची हत्यारे कालौघात बव्हंशी नष्ट झाली तरी भाला, भालाफेकीची काठी, धनुष्यबाण व खणण्याची काठी ही महत्त्वाची अश्मयुगीन अवजारे लाकडीच होती, हे निश्चित. हाडे व शिंगे यांजपासून बनविलेल्या अनेक वस्तू आजही टिकून राहिल्या आहेत. त्यांत प्रामुख्याने बाणांची टोके, मासेमारीसाठी छोटे काटेकारी बाण, गळ, सुया, दाभणे यांचा समावेश होतो. ह्यांपैकी काही वस्तूंची निर्मिती जरी  उत्तरपुराणा-श्मयुगात होऊ लागली असली, तरी त्यांतील वैविध्य व कौशल्य आंतराश्मयुगातच पाहावयास मिळते. या काळातच हस्तिदंताच्याही वस्तू बनविण्यात येऊ लागल्या.

👉अग्नी :--> तांत्रिक विद्यांच्या बरोबरीने अग्नीचेही मानवाला मोठे साहाय्य झाले आहे. अश्मयुगातील सर्वांत प्राचीन असे मानवसंबद्ध अग्नीचे अवशेष चीनमधील जोकोत्येन येथील गुहांत मिळाले आहेत. यदृच्छया निर्माण झालेला अग्नी तसाच तेवत ठेवण्याची कला जोकोत्येनच्या रहिवाशांना माहीत असावी. पुढे अश्म- युगाच्या विविध खंडांत सर्वत्र मानवाने अग्नीचा सतत उपयोग केलेला दिसतो, मात्र तो अग्नी त्याने उत्पन्न केला, की वणव्यासारख्या आगीची धग टिकवून धरली, हे सांगता येत नाही. लाकडे, हाडे किंवा क्वचित कोळसा (पॅलेस्टाइन) या कामाला सर्पण म्हणून वापरलेला असे. अग्नी निर्माण करण्याची विद्या उत्तरपुराणा- श्मयुगात साध्य झाली असण्याची शक्यता आहे. आंतराश्मयुगात व नवाश्मयुगात ती नक्कीच हस्तगत झाली होती. गारगोटी व लोखंडाचा अंश असलेला दगड यांच्या घर्षणातून अग्नी उत्पन्न करीत. अग्नीचा उपयोग कृत्रिम रीत्या उष्णता व उजेड निर्माण करणे, कच्चे मांस भाजून खाणे, जनावरांची चरबी दगडी दिव्यात घालून वाती जाळणे, जनावरांना घाबरवून स्वत:चे रक्षण करणे, काठ्यांची व हाडांची टोके भाजून ती टणक करणे इत्यादींसाठी होत असे. आंतराश्मयुग व नवाश्मयुग यांत अग्नीचा सुटसुटीतपणे वापर करता यावा म्हणून शेगड्या, चुली, भट्ट्या तयार करण्यात आल्या होत्या. स्वयंपाकाबरोबरच, मातीच्या मूर्ती अथवा भांडी भाजणे यांसाठीही नवाश्मयुगात अग्नीचा वापर झाला. अशा भट्ट्या काही नवाश्मयुगीन वसाहतींच्या अवशेषांत मिळाल्या आहेत. 

👉उपकरणे,भांडे  :--> पुराणाश्मयुगातील व आंतराश्मयुगातील अत्यंत अस्थिर आणि भटके जीवन लक्षात घेता, मानवाला काही साठवणाची गरज भासली असेल, असे वाटत नाही. साठवून ठेवण्यासाठी वेळ अथवा निकड त्याला भासावी असे पदार्थही त्या वेळी त्याच्याजवळ नव्हते. उत्तरपुराणाश्मकालीन गुंफांतील चित्रकारांनी वापरलेले दगडी दिवे सोडले, तर अन्य कसलेही भांडे ज्ञात नाही. पुढे नवाश्मयुगाच्या पूर्वार्धात जेरिको, जार्मो येथील माणूसही फक्त दगडीच भांडी वापरीत होता. यांत कटोरे, पेले असे काही प्रकार आढळतात. दगडी भांड्यांच्या घडणीत व सजावटीत थोडा फरक स्थलकालपरत्वे आढळतो. उदा., सायप्रसमधील खिरोकिटिया येथील भांडी घासून घासून झिलईदार करण्यात येत. परंतु त्यांच्या आकारात फारसे वैविध्य नाही. दगडाप्रमाणेच लाकडी ठोकळे कोरून त्यापासून भांडी तयार करण्यात येत असतीलही, परंतु त्यांचे आज अवशेष नाहीत.

नवाश्युगाच्या पूर्वार्धापर्यंत मृत्पात्रे करण्याची विद्या मानवाला हस्तगत झालेली नव्हती. नवाश्मयुगाच्या मध्यापासून अशी भांडी बनविण्याला आरंभ झाला. निदान पश्चिम आशिया व भूमध्य समुद्राभोवतालचा प्रदेश यांपुरते तरी हे विधान निश्चित पुराव्यांवर आधारलेले आहे. मृत्पात्रे तयार करण्याची विद्या केवळ याच लोकांना साध्य झाली, असे समजण्याचे कारण नाही.तिचा उगम निरनिराळ्या ठिकाणी स्वतंत्रपणेही झाला असेल. तद्वतच ती याआधीही कोणा समाजाला साध्य झाली असेल. पण प्रत्यक्ष आधाराने सांगता येते, ते फक्त पश्चिम आशियाविषयी. या कलेचा उगम कसा झाला याविषयी जी अनेक मते प्रचलित आहेत, त्यांत जास्त ग्राह्य अनुमान असे, की आधीपासून वापरात असणाऱ्या बांबूच्या टोपल्यांना माती लिंपण्यास आरंभ झाला. एखादी अशी टोपली केवळ योगायोगाने जळाली असावी व लिंपलेल्या मातीचे झालेले तुकडे हाती लागले. अशा अपघातातून मातीच्या दोन गुणांचा शोध लागला. ते म्हणजे–मनाजोगता आकार देता येणे व भाजून काढले तर तो आकार पक्का होणे. याच माहितीचा उपयोग करून मृत्पात्रे करण्यास आरंभ झाला. भांडी करताना, त्यांना आधीपासून दगडी-लाकडी भांड्यांना देण्यात येणारे वाडगे, कुंडे यांसारखे आकार तर दिलेच पण ठेवरेवीला, विशेषत: पाणी व तत्सम द्रवपदार्थ यांच्या ने-आणीला, जास्त उपयुक्त अशी लहान तोंडाची भांडीही तयार करण्यात येऊ लागली. भोपळा, नारळ अशांसारख्या फळांवरून हे आकार सुचले असावेत. कदाचित या फळांच्या कवचांचा असा उपयोग यापूर्वीही केला जात असावा. लवकरच या भांड्यांना रंग लावून व त्यांवर नक्षी उमटवून ती सुशोभित करण्यासही सुरुवात झाली असावी. यापुढे निरनिराळे आकार, भांडी घडविण्याच्या पद्धती यांचे शोध लागत गेले. चाकाचा शोध लागला अधिक प्रमाणबद्ध व डौलदार भांडी तयार होऊ लागली. भांडी भाजण्यासाठी निरनिराळ्या प्रकारच्या भट्ट्याही वापरात आल्या. परंतु हा सर्व पसारा नवाश्मयुग व ताम्रपाषाणयुग  यांच्या संधिकालातीलच आहे.

                बांबू,लव्हाळे व वेत एकत्र गुंफून, मासे पकडण्यासाठी खूप मोठाल्या टोपल्या आंतराश्मयुगीन यूरोपात (डेन्मार्क – एर्टेबोल संस्कृती) वापरीत. याच्या पुढची पायरी म्हणजे चटया विणणे आणि शेवटी घरगुती उपयोगाच्या लहानमोठ्या टोपल्या, दुरड्या विणणे ही होय. पॅलेस्टाइनमधील जेरिको व जार्मो आणि ईजिप्तमधील फायूम यांसारख्या ठिकाणच्या नवाश्मयुगीन थरांत मातीवर उमटलेल्या ठशांच्या स्वरूपात टोपल्या व दुरड्या यांचे अवशेष पाहावयास सापडतात. यांग-शो या चिनी नवाश्मयुगीन समाजास बुरूडकाम अवगत होते. अमेरिकेतील बुरूडकामाचा पुरावा साधारण पॅलेस्टाइनइतकाच इ.स.पू. सातव्या सहस्रकातील असून दक्षिण अमेरिकेतील बुरूडकाम अत्युकृष्ट दर्जाचे समजले जाते. 

स्त्रोत--> https://vishwakosh.marathi.gov.in/26529/

संकलन--> निलेश पाटील
(मुख्य संपादक/अॅडमिन,परीक्षा विश्व)
मो.9503374833

No comments:

Post a Comment

बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे (बीएआय) अध्यक्ष हिमंता बिस्वा सरमा यांची बीडब्ल्यूएफ परिषदेसाठी निवड.

 ✍️ बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे (बीएआय) अध्यक्ष हिमंता बिस्वा सरमा यांची बीडब्ल्यूएफ परिषदेसाठी निवड. बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे (बीएआय...